औरंगाबाद : गारखेडा परिसरातील मधुराज हाउसिंग सोसायटी येथील 23 वर्षीय तरुणीने व मुकुंदवाडी परिसरातील भारत नगर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनेची नोंद पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तर सावंगी बायपास रोडलगत पोखरी पिसादेवी शिवारात एका अज्ञात महिलेची हत्या करून तिला अर्धवट जाळण्यात आले आहे.
गौरी सुशील खवसे (वय 23 वर्षे, रा. मधुराज कॉलनी, गारखेडा) व पुनम अर्जुन वाघाळे (वय 15 वर्षे, रा. भारत नगर) असे गळफास घेऊन आत्महत्या करणार्या तरुणींची नावे आहेत. तर हत्या झालेल्या महिलेची ओळख अजून पटली नाही.
23 वर्षीय गौरी खवसे ही तरुणी आपल्या आई वडिलांसोबत गारखेडा परिसरातील मधुराज हाउसिंग सोसायटी येथे राहत होती. सध्या ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिसर्या वर्षातील काही विषयांमध्ये नापास झाली होती. त्या विषयांची 22 मे रोजी तिने परीक्षा दिली. काल नेहमी प्रमाणे रात्री आईसोबत बाहेर फिरण्यासाठी गेली होती. बाहेरून आल्यावर रात्री दुसर्या मजल्यावरील खोलीत अभ्यास करते म्हणून गौरी वरच्या खोलीत गेली. मात्र, आज सकाळी आईने गौरीला हाक मारली असता तिने प्रतिसाद दिला नाही. आईने दरवाजा वाजविला तरीदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडून आत पाहिले असता गौरीने छताच्या लोखंडी रॉडला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही माहिती पुंडलिकनगर पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांच्या मदतीने गौरीला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गौरीला तपासून मृत घोषित केले. तर दुसर्या घटनेत पूनम वाघाळे या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने चुलत्याच्या घरी लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. पूनमने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये चुलत्याला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे दोन दिवसांपूर्वीच आली होती. काल चुलतीसोबत ती शहरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री फेरफटका मारून पूनम वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेली होती. आज सकाळी चुलतीने पूनमला आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर चुलत्याने दरवाजा तोडून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दोन्ही आत्महत्यांचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अधिक तपास पोलिस करीत आहेत.